मरबाडमध्ये 'कोरोना' चा पहिला रुग्ण

मुरबाड तालुक्यात 'कोरोना' चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तो डॉक्टर असलेल्या आपल्या एका नातेवाईकाकडे अमेरिकेहून मुरबाडमध्ये राहण्यासाठी आला होता. १४ दिवस क्वारंटाइन केल्यानंतर त्याला 'कोरोना' ची लागण झाल्याचे आढळून आले असून तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान मुरबाड मधील तीन किलोमीटरचा परिसर प्रशासनाने सील केला असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. मुरबाड मधील विद्यानगर या भागात असलेल्या एका इमारतीत गेल्या चौदा दिवसांपासून अमेरिकेहून आलेली एक व्यक्ती आपल्या नातेवाईकाकडे राहत होती. मंगळवारी त्याची कोरोना चाचणी घेण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, कोरोनाबधित व्यक्ती राहत असलेल्या इमारतीला सील ठोकण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण छत्तीस वर्षांचा असून त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.